भाजपाकडून आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना संधी मिळालेली नाही. दरम्यान, तावडेंना आज भाजपाकडून राष्ट्रीय स्तरावर मोठी जबादारी देत, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून नियुक्त केले गेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात माध्यमांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्वाची संधी का मिळत नाही? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
पक्षांतर करून आलेल्यांना भाजपची विधान परिषदेची उमेदवारी
“ पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना देखील प्रतिनिधित्व मिळेल. बावनकुळेंना दोन वर्षानंतर प्रतिनिधित्व मिळालं, त्यांनीही मिळेल. आम्ही सगळेजण संघटनेतील जबाबदारी आणि निवडणुकीची जबाबदारी यामध्ये संघटनेची जबाबदारी जास्त महत्वाची मानतो. त्यामुळे आता अखिल भारतीय सरचिटणीस ही जबाबदारी एवढी मोठी जबाबदारी आहे, की त्यापुढे त्यांचे दोन वर्षांपूर्वी तिकीट कापलं हा विषय मागे पडतो तरीही, राजकारणात राहणारा माणूस हा शेवटी निवडणुका लढवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी, संविधानिक पदावर जाण्यासाठी इच्छुक असतो. बावनकुळेंचं झालं, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांचे देखील होईल. या वर्षभरात खूप वाव आहे.”
विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती
तसेच, “पंकजा मुंडे आमच्या कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. दर महिन्यांने दोन महिन्यांनी आमची अत्यंत छोटी अखिल भारतीय मंत्री धरून १२-१३ जण एवढी छोटी कोअर कमिटी आहे, त्याच्या त्या सदस्या आहेत. विनोद तावडे यांच्याकडे संपूर्ण हरियाणाची जबाबदारी असल्याने, असं ठरलं की ते जेव्हा वेळ असेल तेव्हा आमची जी २२ जणांची एक्सटेंड कोअर कमिटी आहे त्यात असतील. ते आमच्या महाराष्ट्रातील दोन महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाराष्ट्रातील मिडीया या दोन मोठ्या विषयाचे प्रभारी आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश सोबत महाराष्ट्रातील सर्व विषयात लक्ष देण्याची जबाबदारी आहे. पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचं सह प्रभारी म्हणून काम दिलं आहे. त्यात त्या खूप प्रवास करत आहेत. बरोबरीने महाराष्ट्रातही त्यांचे लक्ष आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी त्या पूर्ण दिवस उपलब्ध होत्या.” असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
माझ्या दृष्टीने हा व्यक्तिगत आनंदाचा विषय आहे –
याचबरोबर विनोद तावडेंच्या पदोन्नतीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “माझ्या दृष्टीने हा व्यक्तिगत आनंदाचा विषय आहे. कारण, विनोद तावडे आणि मी विद्यार्थी परिषदेत एकत्र काम केलेलं आहे. अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर आमच्या घरातील दुसरा मुलगा असं त्यांना मानलं जातं. विनोद तावडे अखिल भारतीय सरचिटणीस झाल्यामुळे, त्यांना तिकीट नाकारल्या गेल्यावर आता विनोद तावडेंवर अन्याय झाला, ते संपले, त्यांना पक्षात स्थान नाही राहीलं असं म्हटलं होतं. त्या सगळ्यांना आता लक्षात असं आलं की जे जे संयम ठेवतात, पक्षाशी निष्ठा ठेवतात, पक्षावर रिअॅक्ट होत नाहीत. त्यांना भविष्यात अनेक विषय जे निर्माण झालेले असतील ते संपल्यानंतर पुन्हा एकदा ते स्थान मिळते, किंबहूना चांगलं स्थान मिळतं. याचं मोठं उदाहरण आता नागपूर स्थानिय स्वराज्य संस्थेत आमचे चंद्रशेखऱ बावनकुळे यांना तिकीट मिळणं आहे. पंकजा मुंडे अखिल भारतीय सचिव होणं आहे, याचं मोठं उदाहरण अगोदर अखिल भारतीय सचिव आणि आता अखिल भारतीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी होणं हे आहे.”
शिवसेनेवर देखील निशाणा साधला –
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला, “ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, त्यावेळी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला. त्यांनी मारच खाल्ला आहे. अर्थात शिवसेना भाजपापासून दूर गेल्यानंतर आमचं हिंदुत्व काही कमी झालं नाही. त्यामुळे सावरकरांवर जेव्हा जेव्हा अशाप्रकारची टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसच्या एका मध्यप्रदेशमधील कार्यकर्त्याने सावरकरांबद्दल अपशब्द वापरले होते त्यावेळी आम्ही विधानसभा सभागृह बंद पाडलं होतं. होय मी पण सावरकर असं लिहिलेल्या टोप्या घालून आम्ही सभागृहात बसलो होतो. हे सत्य आहे की महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा एकत्र असताना, या विचारधारेवर आघात झाल्यानंतर ज्याप्रकारे बाळासाहेब ठाकरे हे कडाडून हल्ला करायचे, त्यातून अनेकांची हिंमत देखील व्हायची नाही. पण म्हणून काही बिघडलेलं नाही, आमचं मिशन हे आमच्या रक्तातच भिनलेलं आहे. आता उद्या सकाळी सामनामध्ये माझ्यावर अग्रलेख वाचायला मिळेल, त्याची तयारी ठेवा. सावरकरांवर जहरी टीक झाल्यानतंर शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिल्या गेल्याचं मला तरी कुठं पाहायला मिळालेलं नाही. सावरकर जयंती किंवा पुण्यतिथीला साधं ट्विट केलेलं देखील मला कुठं पाहायला मिळालेलं नाही. अर्थातच त्यांनी जी लाईन पकडलेली आहे. जे दोन पक्ष पकडलेले आहेत, ते तर यावर सहमतच आहेत की हिंदुत्ववादी सावरकर. त्यांना सामाजिक, विज्ञानवादी सावरकर कधी समजले नाही. हिंदुत्ववादी सावरकर ते तर त्यांना चालणारच नाही. कारण, त्यांची विचारधाराच लांगुलचालणाची आहे. आता त्यांच्याबरोबर सरकार करायचं तर त्यांच्या प्रमाणे चालावं लागेल.”