पुणे : काही दिवसांपूर्वी शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणेकरांना उकाड्याचा अनुभव येत आहे. रविवारी मगरपट्टा येथे ३५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. शहर आणि परिसरात जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. साधारणपणे गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी होऊन आकाश ढगाळ होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र होऊन ऊन पडत आहे. परिणामी, तापमानात वाढ होऊन ऐन पावसाळ्यात तीव्र उकाडा सहन करावा लागत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांतील तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता शहर आणि परिसरातील कमाल तापमान सरासरी ३० अंश सेल्सियसच्या पुढेच असल्याचे दिसून येते. त्यात १३ ऑगस्ट रोजी मगरपट्टा येथे ३३.२ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३२.१, शिवाजीनगर येथे ३१.५, एनडी येथे ३०.८, पाषाण येथे ३०.६ १४ ऑगस्ट रोजी मगरपट्टा येथे ३४.४ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३२.३, शिवाजीनगर येथे ३१.७, एनडीए येथे ३१.५, पाषाण येथे ३१ अंश सेल्सियस, १५ ऑगस्ट रोजी मगरपट्टा येथे ३३.८ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३२.८ शिवाजीनगर ३१.६, एनडीए येथे ३१.९, पाषाण येथे ३१.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर शुक्रवारी मगरपट्टा येथे ३३.५ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३३, शिवाजीनगर येथे ३२.४, एनडीए येथे ३१.७ पाषाण येथे ३१.६ अंश सेल्सियस, शनिवारी मगरपट्टा येथे ३४.१ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३३.५, शिवाजीनगर येथे ३२.६, एनडीए येथे ३२.३ पाषाण येथे ३२ अंश सेल्सियस, रविवारी मगरपट्टा येथे ३५.८ अंश सेल्सियस, कोरेगाव पार्क येथे ३५.४, शिवाजीनगर येथे ३३.७, एनडीए येथे ३३.५, पाषाण येथे ३३.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
हेही वाचा : पुणे: नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅल बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीच्या ईमेलमुळे घबराट
मोसमी पावसात सध्या खंड पडला आहे. अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प येत आहे. त्यामुळे दिवसभर ऊन आणि सायंकाळी गडगडाटी पाऊस असे वातावरण आहे. पाऊस नसल्याने तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस उकाड्याचे असणार आहेत. त्यानंतर तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.