पुणे : पुणे मेट्रो मार्गात सध्या तांत्रिक बिघाडाचा खोडा सुरू आहे. मागील सलग दोन दिवसांत मेट्रो सेवा काही काळ बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वारंवार घडणाऱ्या या घटनांची चौकशी महामेट्रोने सुरू केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रुबी हॉल ते वनाझ मार्गावरील मेट्रो सेवा मंगळवारी (ता. ३) अचानक अर्धा तास खंडित झाली होती. या मार्गावरील मेट्रो २१ मिनिटे नळस्टॉप स्थानकावर थांबून होती.
मेट्रोच्या ओव्हरहेड केबलला पक्षी धडकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन सेवा बंद झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. ४) मेट्रोच्या गाडीत तांत्रिक बिघाड झाला. गाडी काही मिनिटे विलंबाने आली; परंतु, ती अतिशय संथ गतीने आली. प्रवाशांनी आतमध्ये जाण्यासाठी दरवाजासमोर गर्दी केली. परंतु, ते उघडले नाहीत. अखेर काही वेळाने दरवाजे न उघडता मेट्रो पुढे गेली.
हेही वाचा : जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून राजस्थानमधील चोरट्याने ‘अशी’ केली फसवणूक
त्यानंतर काही मिनिटांनी आलेल्या दुसऱ्या मेट्रोने प्रवाशांना प्रवास करावा लागला. मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. त्यामुळे आता मेट्रोने बुधवारी झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे म्हणाले, की मेट्रो गाडीच्या दरवाजाच्या सेन्सरमध्ये समस्या निर्माण झाल्याने बुधवारी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मेट्रोत एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास प्रत्येक विभागाची शीघ्र प्रतिसाद पथके आहेत. जिथे बिघाड झाला असेल, तिथे ती तातडीने पोहोचून दुरुस्ती करतात. तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या कारणांची चौकशी केली जाते. याचबरोबर संबंधितांना याबाबत विचारणाही केली जाते. आगामी काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पावले उचलली जात आहेत.
हेही वाचा : कौटुंबिक वादातून खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या
“मेट्रोची यंत्रणा अजून नवीन आहे. त्यात होणारे बिघाड तातडीने दुरुस्त केले जात आहे. ओव्हरहेड वायरला पक्षी धडकणे आपण टाळू शकत नाही. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होतो. त्यानंतर १० मिनिटांत यंत्रणा पूर्ववत केली जाते. हा वेळ आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.