पुणे : तुम्ही केवळ जगाकडे पाहत बसून त्यात बदल घडत नाहीत. तसेच केवळ घोषणाबाजीने जगात बदल होत नाही. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘विकसित भारत’ची घोषणा केली म्हणून त्यातून हेतू साध्य होत नाही. प्रत्यक्षात जमिनीवर हे बदल किती दिसून आले हे महत्त्वाचे ठरते, असे भाष्य बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी शुक्रवारी केले.
केंद्र सरकारच्या विविध घोषणांचा संदर्भ देऊन बजाज म्हणाले, की केवळ घोषणाबाजीने काहीही साध्य होत नाही. घोषणाबाजीने तुम्हाला जग बदलता येत नाही. ‘मेक इन इंडिया’च्या घोषणेने जग बदलत नाही. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’, ‘लोकल फॉर व्होकल’ आणि ‘विकसित भारत’ यांसारख्या घोषणा देऊनही जगात बदल घडत नाही. तुमच्याकडे जग बदलण्याची कौशल्ये येत नाहीत तोपर्यंत हा बदल अशक्य आहे. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वांतर्गत मी हजारो कोटी रुपये खर्च करणार आणि अब्जावधी लोकांच्या जीवनात बदल घडविणार अशा मोठ्या घोषणा करून मी बदल घडवू शकणार नाही. त्यामुळे या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या का, हा विचार आता थोडा वेळ थांबून करायला हवा.
हेही वाचा : कोकणातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट? काजू उत्पादनात घट; दरही कमी
केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बजाज यांनी बोपोडीतील एका पुलाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, की बोपोडीत २० वर्षांपूर्वी एक पूल उभारण्यात आला. हा पूल अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. त्या वेळी एका सत्ताधारी राजकारण्याने मला प्रश्न विचारला होता, की तुम्ही नवीन काय करीत आहात? त्यावर आम्ही जागतिक दर्जाची दुचाकी बाजारात आणत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आम्ही पल्सर दुचाकी आणली आणि आता २० वर्षांत ती २० लाख विक्रीचा टप्पा पार करणार आहे. उद्योगांप्रमाणे राजकारणी अथवा सरकार जागतिक दर्जाचे काम का करीत नाहीत? सरकार कोणतेही असले, तरी त्याने जागतिक दर्जाचे नसले, तरी किमान चांगले काम करावे.
हेही वाचा : पुण्यात वाढल्या उन्हाच्या झळा
उद्योगांनी जागतिक दर्जाचे काम करावे, अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आम्ही जागतिक दर्जाचे काम केले नाही, तरी किमान चांगल्या दर्जाचे काम करतो. प्रत्येकाने आपले काम उत्तम पद्धतीने करावे. याचप्रमाणे सरकारने किमान चांगले काम करणे अपेक्षित आहे.
राजीव बजाज, व्यवस्थापकीय संचालक, बजाज ऑटो