पुणे: नाशिकमधील पार्टीमुळे चर्चेत आलेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात असून, या कालावधीमध्ये एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी दिली. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या कथित सहभागाची सादर करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. संबंधित ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कुत्ता २०१६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई २०२० मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा… …अन् विनोद तावडे म्हणाले, ‘हम पुरी खबर रखते है…’
सलीम हा मूळचा तामीळनाडूमधील तंजावरधील कुट्टा गावाचा रहिवासी आहे. उदरनिर्वाहासाठी तो ९० च्या दशकात मुंबईत आला होता. तेथे तो दाऊद टोळीतील गुंड महंमद डोसा याच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आल्या. त्याच्याविरुद्ध पायधुनी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचे तपासात आढळून आले होते. बाॅम्बस्फोट प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
कुट्टा गावावरुन गुन्हेगारी जगतात ‘कुत्ता नाव’
दाऊद टोळीतील महंमद सलीम मीर शेख उर्फ सलीम कुत्ताची गुन्हेगारी जगतात क्रुर अशी ओळख होती. आक्रमकतेमुळे सलीम कुत्ता असे टोपणनाव पडले. कुत्ता नावामुळे आपली बदनामी होते असा दावा करून ‘टाडा’ न्यायालयात त्याने नावातून कुत्ता हा शब्द वगळण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती.