पुणे : राज्यातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे असताना कशाच्या आधारे टोल घेतला जात आहे. लोक मेले तर मरू दे, असेच सध्या राज्यकर्त्यांचे धोरण दिसत आहे. टोल कशासाठी घेतात आणि टोलचे पैसे कोणाकडे जातात, यावर भाजप नेत्यांनी बोलावे, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे केली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसेच्या शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अमित ठाकरे यांचे वाहन रोखल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यावरून भाजप नेत्यांनी टीका केली होती. या संदर्भातही राज यांनी प्रतिक्रिया दिली.
अमित टोलनाके फोडत चालला आहे, असे नाही. टोलनाक्यावर त्याची गाडी बराच वेळ होती. फास्टॅग असूनही गाडी अडविण्यात आली. टोल भरल्याचे सांगितल्यानंतरही त्याला अडवण्यात आले. त्यामुळे तोडफोड झाली. ही स्वाभाविक कृती होती.भाजपने टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? राज्यातील रस्त्यांवर खड्डे आहेत, तर टोल कशावर घेता आणि टोलचे पैसे कोणाला मिळतात, यावर भाजप नेते बोलणार का, अशी विचारणाही त्यांनी केली. सध्या राज्यात विरोधी पक्ष नाही. विरोधी पक्षनेताही नाही. कोणता पक्ष विरोधी आहे, हेच समजत नाही. या परिस्थितीत मनसेच एकमेव विरोधी पक्ष राहिला आहे. बाकी सगळय़ांचे एकमेकांशी लागेबांधे आहेत.