लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उशिरा पोहोचल्याने राज ठाकरे संतप्त झाले. बैठकीला पदाधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात आल्यानंतर बैठक रद्द करत राज तातडीने मुंबईला रवाना झाले. दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शास्त्री रस्त्यावरील पक्ष कार्यालयात विभाग प्रमुख आणि अन्य काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार होती. मात्र या बैठकीची वेळ दुपारी निश्चित करण्यात आली. राज ठाकरे या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. तसेच निवडणूक तयारीचा आढावाही राज यांच्याकडून घेतला जाणार होता. त्यानुसार राज दुपारी पक्ष कार्यालयात पोहोचले. या बैठकीसाठी पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारी उपस्थित नव्हते. राज ठाकरे पक्ष कार्यालयात आल्याचे समजल्यानंतर पदाधिकाऱ्यांची पक्ष कार्यालयात पोहोचण्यासाठी धावपळ उडाली. पदाधिकारी पक्ष कार्यालयात पोहचेपर्यंत संपत्त राज ठाकरे बैठक न घेता मुंबईकडे रवाना झाले.
आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार?
दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नाही. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका सायंकाळपर्यंत सुरू होत्या, असा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला.