पुणे : पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत घडली. पत्नीने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांड घातले, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख तोडले. याप्रकरणी पत्नीविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत पतीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीसाठी हरभरे भिजवले होते. रविवारी (१ डिसेंबर) भिजवलेले हरभरे न खाल्ल्याने दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात लाटणे मारले. लाटण्याचा मारापासून वाचण्यासाठी पतीने दोन्ही हात वर केले. तेव्हा पत्नीने त्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले. त्यानंतर पत्नीने पतीच्या करंगळीचा चावा घेऊन नख तोडले. मारहाणीत जखमी झालेल्या पतीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ४० वर्षीय पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार परीट तपास करत आहेत.
हेही वाचा – पुणे : सायबर चोरट्यांकडून ७५ लाखांची फसवणूक
पतीकडून पत्नीला बेदम मारहाण
दुसऱ्या एका घटनेत उत्तमनगर परिसरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पायगुडे चाळ परिसरात दाम्पत्य राहायला आहे. आरोपी पती रिक्षाचालक आहे. त्याच्या ३२ वर्षीय पत्नीने रिक्षाचे हप्ते भरले. रिक्षाचे हप्ते मला न सांगता का भरले ? अशी विचारणा करुन पतीने पत्नीला शिवीगाळ करुन पोटात लाथ मारली. पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.