पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून पत्नीने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने मारेकऱ्यांना पाच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला बुधवारी रात्री अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी मोहिनी सतीश वाघ (वय ५३, रा. फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली. वाघ यांच्या खून प्रकरणात यापूर्वी आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय ३० रा. शांतीनगर, धुळे ) नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२ रा. अनुसया पार्क, वाघोली) अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होता. वाघ आणि अक्षय यांच्यात वाद झाले होते. त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितले होते. मोहिनी यांच्याशी असलेली जवळीक त्यांना खटकली होती. वाघ यांच्या जाचामुळे पत्नी मोहिनी यांनी अक्षयला पतीचा काटा काढण्यास सांगितले.

हेही वाचा – समन्वय नावाचा आणि समजूतदारपणाचा आमचा फॉर्म्युला : चंद्रकांत पाटील

हेही वाचा – पुणे : बसचालकाकडून शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, कोंढवा पोलिसांकडून बसचालक गजाआड

पतीच्या खूनासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर अक्षयने सराइत गुन्हेगार पवन शर्मा याला सुरुवातीला दीड लाख रुपये दिले. वाघ दररोज सकाळी फिरायला जायचे. नऊ डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरायला पडले. आरोपी अक्षय, पवन, नवनाथ, विकास, आतिश यांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. धावत्या मोटारीत वाघ यांच्यावर आराेपींनी चाकूने ७२ वार केले. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील ऊरळी कांचन परिसरात टाकून आरोपी पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपींना अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife involved in satish wagh murder case 5 lakh supari to the murderers pune print news rbk 25 ssb