अवघ्या काही तासात या घटनेने वेगळे वळण घेतले आहे
पुण्याच्या मावळमधील गहुंजे येथे तरुणाच्या हत्येने वेगळ वळण घेतले आहे. वारंवार होत असलेला शारीरिक छळ, मारहाण याला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झाले आहे. अशी माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी हत्या झालेल्या सुरजच्या पत्नीला तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अगोदर पतीला अज्ञात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. परंतु, पोलिसांपुढे हा बनाव जास्त काळ टिकू शकला नाही.
हेही वाचा >>> पुणे : लोणी काळभोरमध्ये बैलगाडा शर्यतीत दुर्घटना; स्टेज कोसळून एकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी
पोलिसांपुढे स्वतः हत्या केल्याचे सुरजच्या पत्नीने मान्य केले आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पुण्याच्या मावळमधील गहुंजे येथे दुपारी तरुणाची धारदार शस्त्राने अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. अवघ्या काही तासातच या घटनेने वेगळे वळण घेतले असून पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याचं उघड झाले आहे. सुरज काळभोर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) असल्याने सुरजला पत्नी शिरगाव येथे प्रतिशिर्डीच्या दर्शनासाठी घेऊन गेली, दर्शन झाल्यानंतर गहुंजे येथील त्यांच्या शेतात गेले. तिथं त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
हेही वाचा >>> पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्याने केली घोडीची शिकार! ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बेसावध असलेल्या सुरजवर पाठीत चाकूने वार केले. मग टिकावाने घाव घातले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सर्व प्लॅन अगोदरच सुरजच्या पत्नीने आखल्याचे समोर आले आहे. सुरज पत्नीला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा, तसेच पत्नीचा गळा देखील आवळला होता. या सर्व जाचाला कंटाळून पत्नीने सुरजला संपवायचं असं ठरवलं होतं. तिने टोकाचे पाऊल उचलत आपल्याच पतीची हत्या केल्याचे आता उघड झाले आहे. सव्वा महिन्यापूर्वीच मोठ्या थाटात दोघांचा विवाह लावून देण्यात आला होता. परंतु, दोघांमध्ये सतत उडत असलेल्या खटक्यांवरून टोकाचा निर्णय पत्नीने घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पती-पत्नीने सामंजस्याने दोघांमधील वाद सोडवायला हवेत.