पुणे : गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी (५ जानेवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर पुणे पोलिसांनी या घटनेतील आठ आरोपींना अटक केली. सध्या या घटनेची पुणे शहरात एकच चर्चा सुरू आहे. अशातच शरद मोहळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी स्वाती मोहोळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची भावना व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हो म्हणत त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असं आश्वासन दिलं.
अटक आरोपींमध्ये कुणाचा समावेश?
१. साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड, पुणे),
२. नामदेव महीपती कानगुडे (वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे)
३. अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे)
४. चंद्रकांत शाहु शेळके (वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे)
५. विनायक संतोष गाव्हणकर (वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे)
६. विठ्ठल किसन गांदले (वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे)
७. अॅड. रविंद्र वसंतराव पवार (वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे)
८. अॅड. संजय रामभाऊ उडान (वय ४३ वर्ष, रा. भुसारी कॉलनी कोथरुड पुणे)
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा आरोपींना १० जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’; टोळीयुद्ध नेमकं कधी सुरू झालं? शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांसमोर काय आव्हान?
गुंड शरद मोहोळच्या हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय समोर आलं?
शरद मोहोळ चालत जातो आहे हे दिसतं आहे. त्याच्या आजूबाजूलाही काही माणसं चालत आहेत. अचानक डाव्या बाजूचा माणूस आणि शरद मोहोळच्या मागे असलेला माणूस बंदूक काढून शरद मोहोळवर गोळ्या झाडतात. लगेच त्या गल्लीत एकच धावपळ माजते. तसंच शरद मोहोळ खाली कोसळतो. त्यानंतर हल्लेखोर काहीही कळायच्या आत पळून जातात. त्यानंतर दोन-तीन लोक येतात ते शरद मोहोळला उठवण्याचा प्रयत्न करतात. उचलून उभं करण्याचा प्रयत्न करतात पण शरद मोहोळ पुन्हा कोसळतो. असं सगळं या सीसीटीव्हीत दिसतं आहे.
हेही वाचा : कोण होता शरद मोहोळ? वाचा ‘हिंदू डॉन’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरदची रक्तरंजित कहाणी…
गुंड शरद मोहोळ कोण होता?
कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ हा अत्यंत विश्वासू साथीदार होता. जर्मन बेकरी प्रकरणातला आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अंडासेलमध्ये मोहोळ गँगने पायजम्याच्या नाडीने आवळून खून केला. या खुनात प्रमुख सहभाग होता तो शरद मोहोळचा. शरद मोहोळ या खुनामुळे चर्चेत आला होता. ४ ऑक्टोबर २००६ या दिवशी पौड फाटा भागात संदीप मोहोळला प्रतिस्पर्धी गँगने म्हणजे मारणे गँगने संपवलं. त्यानंतर शरद मोहोळने निलायम चित्रपटगृह परिसात असलेल्या एका उपहारगृहात प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणेला गोळ्या घालून संपवलं होतं. या प्रकरणात शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेरावला अटक झाली होती. २६ जून २०१६ या दिवशी कातिल सिद्दीकी प्रकरणात शरद मोहोळची सुटका झाली. त्यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत होता. त्याच्या पत्नीने भाजपाचे काम सुतारदारा भागात सुरु केलं होतं. आता याच शरद मोहोळला गोळ्या घालून संपवण्यात आलं आहे.