पुणे : ‘ते मास्क घालून आले होते. लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या. ती मुले आमच्या समोर रडत होती. आम्ही एकमेकींना काय सांगू हेच कळत नव्हते. आम्ही चिखलात पडलो होतो. मला उभेही राहता येत नव्हते…’ असा अनुभव कथन करतानाच, ‘मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही,’ अशा शब्दांत पती संतोष जगदाळे यांना गमावल्याच्या दुःखाला प्रगती यांनी वाट करून दिली.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली. या वेळी जगदाळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. प्रगती यांनी त्यांचा अनुभव या वेळी कथन केला.
‘मी माझ्या माणसाला आता बघू शकत नाही. त्यांनी आमच्या माणसांना जशा गोळ्या घातल्या, तशा त्यांना मारा आणि आम्हाला दाखवा…’ अशी मागणीही या वेळी जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोर केली.
त्या म्हणाल्या, ‘तिकडे कुणीच नव्हते. अधिकारी किंवा सुरक्षारक्षकही नव्हते. पतीच्या उपचारांत दिरंगाई झाली. ‘जिवंत आहेत; जिवंत आहेत,’ असे सांगत होते. पण, आम्हाला तपशिलात काहीच सांगितले नाही.’
एका घोडेवाल्याने प्रतिकार केल्याने त्यालाही मारण्यात आल्याचा अनुभव प्रगती यांनी सांगितला. ‘मी आयुष्यभरासाठी पोरकी झाले आहे. माझा नवरा माझ्या बरोबर नाहीये. या मुलांनी काय करायचे,’ असा हताश प्रश्न त्यांनी विचारला. ‘कालपासून मला त्यांचा चेहरा दिसला नाही, तिथेही आम्हाला दाखविण्यात आला नाही. त्या दहशतवाद्यांना मारा आणि आम्हाला दाखवा…’ असे सांगत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.