चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. अंकिता अनिल तांबूटकर (वय ४५, रा. दुर्गामाता मंदिरा जवळ, जय जवान नगर येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी पती अनिल मनोहर तांबूटकर (वय ५०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे : मूल्य साखळीचा विकास गरजेचा ; केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे प्रतिपादन
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जय जवान नगर दुर्गा माता मंदिराजवळ एका महिलेवर पतीने वार करण्यात आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी तत्काळ गेल्यानंतर अंकिता तांबूटकर घरामध्ये गंभीर जखमी अवस्थेत पडलेली होती. चारित्र्याच्या संशयावरून पती अनिल याने चाकूने तिच्या तोंडावर, छातीवर व गळ्यावर वार करून खून केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांनी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके तपास करीत आहे.