नागरिकांचा अतिरेकी संचार; वन विभागाला नियंत्रण ठेवणे अशक्य

दत्ता जाधव,  लोकसत्ता

पुणे : तळजाई टेकडीवर येण्यासाठी तळजाई मंदिराशेजारील मुख्य मार्गासह अन्य ठिकाणांहून येण्याचे किमान चार-पाच मार्ग आहेत. त्या शिवाय संरक्षक भिंतीवरून उडय़ा मारून, सीमाभिंत फोडून टेकडीवर येण्यासाठी वाटा करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी जंगलात फिरण्यासाठीही अनेक पायवाटा तयार केल्या आहेत. नागरिकांच्या अतिरेकी संचारामुळे वन्य पाण्यांचा अधिवासच धोक्यात आला आहे.

अनेक मार्गाने टेकडीवर नागरिक येत असल्याने वन विभागाला नियंत्रण ठेवणे अशक्य झाले आहे. त्यात भर म्हणून पावसाळा संपला की नागरिक जंगलात फिरण्यासाठी असंख्य वाटा तयार करतात. या वाटा इतक्या झाल्या आहेत की, जंगलाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. उन्हाळय़ात पानगळ होत असल्यामुळे जंगलात कुठेही आणि कसाही संचार करता येतो. हा संचार आता वन्यप्राण्यांच्या अधिवासावर उठला आहे. पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून टेकडीवर लोकांची वर्दळ सुरू होते, ती सकाळी साडेअकरापर्यंत सुरू असते. शनिवार-रविवारी तर टेकडीवर जत्राच भरलेली असते. मंदिराच्या बाजूला असलेल्या खाऊगल्लीमुळे गर्दी हटता हटत नाही. ही सर्व गर्दी टेकडीवरून वाट दिसेल तिकडे जाताना दिसते. त्यामुळे दाट झाडीचा परिसर कमी होत आहे. वन्यप्राणी आणि पक्ष्यांना माणसांपासून सुरक्षित अंतरच कमी झाले आहे.

 तळजाई टेकडीवर हमखास मोर दिसणारी तीन-चार ठिकाणे आहेत. या ठिकाणी काही वन्यप्रेमी पक्ष्यांना खाद्य टाकतात. त्यामुळे पक्ष्यांचा त्या-त्या ठिकाणी वावर असतो. पावसाळय़ात तर हमखास रोज नाचणारा मोर दिसतो. काही जण जाणीपूर्वक दूर अंतरावरून मोरांचे निरीक्षण करतात. पण, काही उत्साही लोक मोरांच्या इतके जवळ जाण्याचा, मोबाइलवर फोटो, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतात की,  मोर खाद्य सोडून निघून जातात. काही अतिरेकी हौशी लोक दाट झाडीतही मोरांचा पाठलाग करीत जातात, इतका अतिरेक अति उत्साहींकडून सुरू आहे.

टेकडीवर येणारे नागरिक मोबाइलवर भक्तिगीते, भजने, मंत्र मोठय़ा आवाजात लावतात. काहीजण सकाळी सात वाजताही हिंदी-मराठी गाणी मोठय़ा आवाजात लावून चालतात. या मोठय़ा आवाजाचा फटका पक्ष्यांना बसत आहे. अनेकजण चालताना मोठय़ाने हाका मारतात, आरोळय़ा ठोकतात त्यामुळे टेकडीवरील नैसर्गिक वातावरण, शांतता नष्ट होते. – गुणवंत रोकडे, तळजाई टेकडीप्रेमी

Story img Loader