अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१९ ला झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. आता तेच पार्थ पवार पुन्हा मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तशी अजित पवार गटाची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
युवा नेते पार्थ पवार बारामती आणि पुण्यातील अजित पवारांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे ते पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदारसंघात ‘सरप्राइज एन्ट्री’ झाली. अजित पवारांचे ते सुपुत्र असल्याने बारामती आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कामाला लागली होती.
हेही वाचा – शिरूर लोकसभा आमदार महेश लांडगे लढवणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
पार्थ पवार यांची आई सुनेत्रा अजित पवार यांनीदेखील प्रचारात खारीचा वाटा घेऊन मुलाच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. अनेकांच्या सभादेखील मावळ लोकसभेत झाल्या. अनेकदा पार्थ पवार हे स्टंटबाजीमुळेदेखील प्रसिद्धी झोतात आले होते. प्रतिष्ठेची लढाई म्हणून मावळ लोकसभेकडे बघितलं जात होतं. परंतु, शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला. हाच पराभव पुन्हा पत्करायला लागू नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट मावळसह शिरूर लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. तशी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – पेटीएम पेमेंट्स बँकेला ५.३९ कोटींचा दंड; पुण्यातील अण्णासाहेब मगर बँकेवरही कारवाई
एकीकडे महायुतीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोसरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सर्वात जास्त मतांनी शिरूर लोकसभेतील उमेदवार निवडून येईल, असा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून असा कोण उमेदवार असणार आहे, जो शिरूर लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून येईल, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.