पुणे : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरु केली आहे. त्याचदरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीसाठीदेखील प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडीदरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काल पुण्यामधून निवडणूक लढविण्याची इच्छा बोलवून दाखवल्याची माहिती समोर येताच, पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हावर वडेट्टीवार म्हणाले, “तुतारी वाजवायला ‘हात’… ”
अमित ठाकरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी मागील दोन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दौरे करत आहे. त्या ठिकाणी विविध प्रश्नांवर आंदोलनेदेखील केली आहेत. त्या सर्व आंदोलनांत आम्हाला यश आले आहे. तसेच आजचा मोर्चा हा विद्यार्थ्यांकरिता होता. या आंदोलनाचा आणि आगामी निवडणुकीचा काही एक संबध नाही. आमची निवडणूक लढविण्याची तयारी कायम सुरूच असते. त्याचबरोबर मी निरीक्षक म्हणून पक्ष श्रेष्ठीकडे अहवाल सादर केला आहे. त्याबाबत पुण्यामधून कोण उमेदवार असेल त्याबाबत ते निर्णय घेतील, पण माझी निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नाही. पण साहेबांनी कोणतीही जबाबदारी दिली तर ती मी जबाबदारी नक्कीच पार पाडेन, मला नगरसेवक किंवा सरपंच बनवलं तरी चालेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.