पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे प्रदीर्घ रजेवर गेले असून ते पुन्हा महापालिकेत रुजू होतील की नाही, याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंढे मार्च २००९ मध्ये प्रतिनियुक्तीवर पिंपरी पालिकेत रुजू झाले. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी मुख्य जकात अधीक्षकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. जकातचोरांचा कर्दनकाळ ठरलेल्या मुंढे यांनी चार वर्षांच्या कालावधीत जकातीच्या उत्पन्नात ५०० कोटींहून अधिक भर घालून नेत्रदीपक कामगिरी केली. दारूची तीन कोटींची जकात १७ कोटींवर नेली. तर, वर्षांकाठी १५ लाख रुपये जकात भरणाऱ्या सराफांकडून साडेसहा कोटींपर्यंत जकात वसुली केली. याप्रकारे उठावदार काम केल्याची दखल घेऊन मुंढेंना एक वर्षांची मुदतवाढ मिळाली. पुढेही चढता आलेख त्यांनी कायम ठेवला. मार्च २०१३ मध्ये त्यांना चार वर्षे पूर्ण झाली. त्याआधीच स्वत:च्या बदलीची मागणी मुंढेंनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली व शासनाकडेही प्रयत्न सुरू केले. तथापि, त्यांच्या बदलीची चिन्हे नाहीत. एक एप्रिलपासून जकात रद्द होऊन एलबीटी सुरू झाली, नव्या करव्यवस्थेचे सर्व नियोजन मुंढे यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यामुळे आणखी एक वर्ष थांबून एलबीटीचे काम पाहावे, अशी मागणी आयुक्त तसेच पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. मात्र, मुंढेंनी राज्यशासनाच्या सेवेत परतण्याची ठाम भूमिका घेतली आहे. मुंढे ३१ मेपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यानंतर आता ते रुजू होतील की नाही, याविषयी कोणालाही खात्री नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा