एकेकाळी पिंपरी पालिकेत सत्ताधीश असलेल्या काँग्रेसचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ, अशी भीमगर्जना काँग्रेसकडून निवडणूक काळात वारंवार करण्यात आली. प्रत्यक्षात तीनही मतदारसंघात काँग्रेसची अनामत रक्कम जप्त झाली आहे. पक्षाचा अलीकडच्या काळातील प्रवास व सध्याची दयनीय अवस्था पाहता, यापुढील काळात अस्तित्व टिकवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
पिंपरी महापालिकेची स्थापना झाल्यानंतरची काही वर्षे शहरावर काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादीचा उदय झाल्यानंतरही काँग्रेसने आपली पकड सोडली नव्हती. मात्र, रामकृष्ण मोरे यांचे निधन झाल्यानंतर वाऱ्यावर सोडल्यासारखी काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था झाली. राष्ट्रवादीची ताकद वाढत गेली. सलग दोन वेळा महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत मिळाले. दुसरीकडे काँग्रेसची घसरण होत गेली. आघाडीच्या राजकारणामुळे स्वतंत्रपणे ताकद आजमावयाची संधी काँग्रेसला मिळत नव्हती. तथापि, आघाडीत बिघाडी झाल्याने यंदा ती मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची भाषा सर्वच नेत्यांनी केली. तीनही उमेदवार निवडून येतील, असे दावेही करण्यात आले. प्रत्यक्षात, भोसरीचे उमेदवार हनुमंत भोसले यांना १४ हजार ३६३, पिंपरीचे उमेदवार मनोज कांबळे यांना ११ हजार २२ आणि चिंचवडचे कैलास कदम यांना ८ हजार ६४३ मते मिळाली.
एकेकाळी िपपरी-चिंचवड म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्या पक्षात अवकळा आहे. ऐन निवडणुकीच्या मोसमात माजी महापौर आझम पानसरे यांच्यासह दत्ता वाघेरे, बाबा तापकीर, गोपाळ कुटे, सतीश दरेकर, विजय लांडे ही माजी नगरसेवकांची टीम राष्ट्रवादीत दाखल झाली. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर पक्षात आहेत की नाहीत, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्याने त्यांचे शहरातील समर्थक धास्तावलेले आणि चिंतेत आहेत. पक्षाच्या नेत्यांनी शहराकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेले सचिन साठे एकटे पडल्याचे चित्र पुढे आले आहे. ‘मिशन २०१७’ डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने काम सुरू केले असले तरी विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता, गतवैभव मिळवून देण्याची भाषा काँग्रेसने लांबणीवर टाकावी, त्याआधी पक्षाचे अस्तित्व कसे टिकवता येईल, याकडे लक्ष द्यावे, अशीच परिस्थिती आहे.

Story img Loader