पुणे : शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. शरद पवार यांना भेटण्यासाठी आढळराव दरवाजे ठोठवत आहेत. मात्र ते जो दरवाजे ठोठावत आहेत, त्याची किल्ली माझ्याकडे आहे, असे डाॅ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. खासदार डाॅ. कोल्हे यांच्या या दाव्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवड, उर्से, शिक्रापूर ‘अंधारात’…अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित

हेही वाचा… पुणे : ‘राष्ट्रवादी’ अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्यावर आरोप केले होते. या संदर्भात बोलताना डाॅ. अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी आढळराव यांना चार वेळा मिळाली. मात्र उद्धव ठाकरे संकटात असताना ते त्यांना सोडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही मी शरद पवार यांच्याबरोबर आहे, असे सांगून कोल्हे म्हणाले, की राज्याच्या राजकीय स्थितीबाबत आढळराव हे माध्यमांसमोर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात. त्यातूनच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते पाठीमागील दरवाजा ठोठावत आहेत. मात्र, ते जाे दरवाजा ठोठावत आहेत, त्याची चावी माझ्याकडे आहे. आढळराव यांच्या वयाचा सन्मान ठेवून मी त्यांचे स्वागत करेन. आढळराव यांच्या या भूमिकेमुळे सन २०१४ मध्ये त्यांचा प्रचार केल्याची खंत वाटत आहे, असे डाॅ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader