पिंपरी पालिका शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही ती घोषणा हवेतच राहिली आहे. प्रशासनाकडून मात्र शब्दांचा खेळ करत लवकरच हे साहित्य उपलब्ध करून देऊ, अशी सारवासारव करण्यात येत आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जूनच्या प्रारंभी शालेय साहित्य देणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही कशाचा कशाला पत्ता नसल्याची परिस्थिती आहे. शिक्षण मंडळाकडून मात्र प्रक्रिया सुरू आहे, असे साचेबध्द उत्तर दिले जाते. विद्यार्थी हितापेक्षा स्वहित पाहणारे व ठेकेदारांच्या तालावर नाचणारे सदस्य व अधिकारी असल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांसमोर ही परिस्थिती निर्माण होते. यंदाच्या वर्षी वेळेत साहित्य मिळेल, अशी घोषणा सभापती विजय लोखंडे व प्रशासन अधिकारी डॉ. अशोक भोसले यांनी केली आहे. मात्र, यंदाही नेहमीची पुनरावृत्ती होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पहिल्या दिवशी वाटपाचे नियोजन असल्याचे सांगितले जात असले तरी वर्तमानपत्रात देण्यासाठी ‘फोटोसेशन’ पुरते जेमतेम वाटप होईल, अशीच शक्यता व्यक्त करण्यात येते.
यासंदर्भात, सभापती लोखंडे व प्रशासन अधिकारी भोसले यांनी सांगितले की, आमची संपूर्ण तयारी झाली आहे. पहिल्या दिवशी तीन प्रकारचे गणवेश व वह्य़ांचे वाटप होईल. कंपास, फुटपट्टी, प्रयोग वही, भूगोल वही हे साहित्य पुढील आठवडय़ात मिळू शकेल. पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने नवी पुस्तके आठवडय़ाभरात येतील व नंतर त्यांचे वाटप होईल. अन्य पुस्तके मात्र मंडळाकडे आली आहेत. याशिवाय, रेनकोट, दप्तराची प्रक्रिया सुरू आहे. बुटाच्या दराचा निर्णय प्रलंबित आहे, त्यानंतर या वस्तूंचेही वाटप होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा