पिंपरी चिंचवड : आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी-चिंचवड मध्ये बोलत होते. तसेच जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्यासोबत आम्ही कधीच हात मिळवणी करणार नाही. हा आमचा स्वाभिमान आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला लुटून सर्व काही गुजरातला नेलं, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा देखील ते पक्ष फोडतील असा दावा त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, मागील निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता महानगर पालिका निवडणुका लढणार आहोत. स्वबळाचा नारा दिला म्हणजे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा अर्थ निघू शकत नाही. मुंबई पुरता स्वबळाचा नारा आहे. आमच्या पक्षाचा तिथे पगडा आहे. आमची पकड आहे. स्वबळावर लढावं हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

पुढे ते म्हणाले, स्वबळावर पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात लढणार याबाबत शाशंका आहे. इतर शहरात एकत्र लढावं असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. पुढे ते म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी हायकमांडचा मान राखला. काहीही करून सत्तेत राहायचं ही या सर्वांची भूमिका आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढल्या. २०२४ चा मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता. तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. मग, कार्यकर्त्यांचा मान राखण्याचा प्रश्न येतो कुठे? यांचं हायकमांड भाजप आहे. त्यांचा आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावा लागला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्याय नव्हता. आपली कातडी वाचवण्यासाठी, आपल्यावरील खटले थांबवण्यासाठी सरकारमध्ये जावं लागलं. पुढे ते म्हणाले, मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडण्यात आलं. त्यापद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल. पक्ष फोडण्याची भाजप ला चटक लागली आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागलं. तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will raj thackeray and uddhav thackeray come together shivsena leader sanjay raut clarified kjp 91 css