पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये आलेले आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजयानंतर काँग्रेसला ‘जवळचे’ झालेले रवींद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:च काँग्रेसला अंतर देणार, की काँग्रेस त्यांच्यापासून अंतर राखणार, असा प्रश्न शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. काँग्रेसमध्ये असूनही कधी शिवसेना कार्यकर्त्याच्या, तर कधी ‘मनसे’ शैलीप्रमाणे ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत धंगेकर वावरत असल्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे लोकसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले असले, तरी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा चांगली लढत दिल्याने आणि पराभवाचे अंतर तुलनेने कमी केल्याने धंगेकर यांचा काँग्रेसमधील वरचष्मा कायम राहील, असे मानले जात होते. शहर काँग्रेसने मात्र याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. ‘धंगेकरांनी कसब्यात निवडून आल्यानंतर काँग्रेसची ध्येयधोरणे स्वीकारण्यापेक्षा कायम त्यांचा वैयक्तिक करिष्मा केंद्रस्थानी ठेवला. त्यांनी शहरातील वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलने केली असली, तरी त्या त्या आंदोलनांवेळी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांशी साधा संवाद साधण्याचे सौजन्यही धंगेकरांनी दाखवले नाही,’ असे एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.

आणखी वाचा-विद्यार्थ्यांचेच मराठीकडे ‘नीट’ दुर्लक्ष; मराठीतील वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत साशंकता

‘गेल्या महापालिका निवडणुकीवेळी धंगेकर यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र, नगरसेवक झाल्यानंतरही धंगेकर यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार काम केले नाही. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांना संधी देऊन आमदार केले, पण काँग्रेसची ध्येयधोरणे आणि विचारधारेशी त्यांची कायमच फारकत राहिली. पक्षाची स्वत:ची यंत्रणा असतानाही धंगेकर यांनी त्यांच्या स्वतंत्र यंत्रणेवर विश्वास ठेवला, तसेच कारसेवकांचा सन्मान करण्याची त्यांची भूमिकाही काँग्रेसच्या विचारधारेविरोधात होती.

धंगेकर यांना काँग्रेसचे नेतृत्व करायचे झाल्यास त्यांची संघटनेवर पकड असणे आणि पक्षाच्या ध्येयधोरणांशी बांधीलकी असणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी त्यांना काँग्रेसमधील सर्वांना विश्वासात घ्यावे लागेल,’ असे हा पदाधिकारी म्हणाला. ‘लोकसभेसाठी मूळ काँग्रेसवासीयांपैकी काहीजण इच्छुक असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर खरेच पक्षाची साथ देणार, की त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करणार, हा प्रश्न आहे.

आणखी वाचा- ‘आरटीई’ची सोडत जाहीर, सर्वाधिक अर्ज कोणत्या शाळेत?

शहरात काँग्रेसची अवस्था बिकट असताना काँग्रेस विचारांवर निष्ठा असलेल्या नेत्याने शहर काँग्रेसचे नेतृत्व करण्याची आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा, विधानसभा निवडणुकीतही फटका बसल्याशिवाय राहणार नाही,’ असे अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत. कोणाचीही नाराजी नाही. निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले. यश मिळाले नाही. मात्र, आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल. -रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

लोकसभेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढली जाण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर लढली गेली. वैयक्तिक करिष्म्यापेक्षा ती पक्षीय पातळीवर लढली गेली असती, तर चित्र वेगळे दिसले असते. -अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will ravindra dhangekar leave congress after losing pune lok sabha elections or party is keeping distance from him pune print news apk 13 mrj
Show comments