लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत एकही आमदार नसलेल्या शिवसेना शिंदे गटाला विधान परिषदेच्या निमित्ताने बळ देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेले माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे किंवा पुरंदरचे माजी आमदार, राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा राज्यपालनियुक्त १२ आमदारांमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर शिंदे- भाजपचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. शिंदे यांच्या बंडानंतर शहरात काही मोजके शिवसैनिक शिंदे यांच्यासमवेत गेले. सध्या शहरात शिंदे गटाची ताकत फारशी नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी, तर शहरातील खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. मध्यवर्ती भागात ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी राज्यपालनियुक्त १२ आमदारांमध्ये पुण्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नाना भानगिरे आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची नावे आघाडीवर आहेत.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमध्ये शंकर जगतापांच्या शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीला अंतर्गत विरोध; भाजपमध्ये दोन गट पडण्याची शक्यता!

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. आगामी काळात महापालिका निवडणुकांबरोबरच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होणार आहे. शहर शिवसेनेत फूट पडली असली, तरी ठाकरे गट भक्कम आहे. त्या तुलनेत शिंदे गटाला ताकत वाढवावी लागणार आहे. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणामुळे शिंदे गटापुढील आव्हानही वाढले आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.