विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या पुणे शहर काँग्रेसला अद्याप जाग आलेली नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यावर मागील अडीच वर्षांनंतर मरगळलेल्या शहर काँग्रेसमध्ये जाग येऊ लागली आहे. अंतर्गत नाराजी, एकमेकांवर कुरघोडी आणि पक्षापेक्षा पद महत्त्वाचे मानून आपल्याच विश्वात रममाण असलेली काँग्रेस आता तरी नवा कारभारी निवडणार का, असा प्रश्न आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतर्गत राजकारण हा काही पुण्यातील काँग्रेसचा आजचा प्रश्न नाही. प्रारंभ काळापासून तो चालत आला आहे. मात्र, पूर्वी त्याला राजकारणाचे डावपेच मानले जायचे. आता पक्षहितापेक्षा व्यक्तिद्वेषाने पछाडलेले राजकारण झाल्याने काँग्रेसची पुण्यात दयनीय अवस्था झाली आहे. अगदी पुण्यात खासदार विठ्ठलराव गाडगीळ आणि माजी आमदार प्रकाश ढेरे यांच्या ताब्यात पुण्यातील काँग्रेस आणि अर्थातच पुणे महापालिका असतानाही गटबाजी होती. गाडगीळ-ढेरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडून राजकीय डावपेच खेळले जायचे. गाडगीळ यांचे मार्गदर्शन आणि प्रकाश ढेरे हे शहराध्यक्ष म्हणून पक्षाचा गाडा हाकत होते. मात्र, तो काँग्रेसचा सुवर्णकाळ होता. तेव्हा भाजप, शिवसेना किंंवा अन्य पक्षांची ताकद ही अल्प होती. काँग्रेसपुढे त्यांचा निभाव लागत नव्हता. काँग्रेसला पराभूत करू शकते ती काँग्रेसच, असे नेहमी बोलले जाते. त्याची सुरुवात या अंतर्गत गटबाजीने झाली. १९८० पासून सलग तीन निवडणुकांमध्ये पुण्याचे लोकसभेत नेतृत्व करणारे विठ्ठलराव गाडगीळ यांचा १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अण्णा जोशी यांनी पराभव केल्यानंतर गाडगीळ यांची पुण्यावरील पकड कमी होऊ लागली. त्यातच १९९६ च्या लोकसभेला काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना उमेदवारी दिली. ते निवडून आले. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसमध्ये कलह निर्माण झाला होता. लोकसभेच्या निवडणुका केंद्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींमुळे १९९८ मध्येच जाहीर झाल्या होत्या. तेव्हा गाडगीळ यांनी ‘पुण्यासाठी वेगळा निर्णय होऊ शकतो’ हे वाक्य कलमाडी यांना अस्वस्थ करण्यास कारणीभूत ठरले आणि त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. कलमाडी यांनी पुणे विकास आघाडी स्थापन केली आणि महापालिकेतील काँग्रेसचे ५० नगरसेवक त्यांच्याबरोबर गेले. काँग्रेसने विठ्ठलराव तुपे यांना उमेदवारी दिल्यानंतर कलमाडी हे भाजपच्या वळचणीला गेले. भाजप आणि शिवसनेच्या साथीने त्यांनी निवडणूक लढविली आणि त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून काँग्रेसच्या पडत्या काळाला सुरुवात झाली. पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कलमाडी स्वगृही परतले आणि सलग दोन वेळा निवडूनही आले. मात्र, दरम्यानच्या काळात २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपावरून त्यांना अटक झाली आणि त्यानंतर काँग्रेसची शहरावरील पकड निसटून भाजपचे प्राबल्य वाढले.

कलमाडी यांच्यानंतर पुण्याला प्रभावी नेतृत्व लाभले नाही. कलमाडी यांच्या काळात शहराध्यक्षपद हे कलमाडी यांच्या समर्थकांकडे कायम राहिले. कलमाडी यांच्या काळात शहराध्यक्षपद शोभेचेच होते. तत्पूर्वी प्रकाश ढेरे यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा होती. त्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीकता असल्याचे मानले जात होते. कलमाडी यांचे पुण्यावर प्राबल्य असताना माजी नगरसेवक अभय छाजेड, त्यानंतर माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे अनेक वर्षे हे पद राहिले. त्यानंतर माजी मंत्री रमेश बागवे यांच्याकडे हे पद आले. जून २०२२ मध्ये त्यांच्या जागी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद कायम वादात राहिले आहे. काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन गट पडले. शिंदे यांच्याविरोधात बागवे, जोशी आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा गट कायम सक्रिय राहिला आहे. शिंदे यांना पूर्णवेळ शहराध्यक्ष पद गेल्या अडीच वर्षांत काँग्रेसला देता आले नाही.

माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर तोडगा काढण्याऐवजी हे भिजत घोंगडे कायम ठेवले. त्याचा परिणाम असा झाला, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. कसबा पेठ, पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा निवडणुकीत बंडखोरी झाली. ती रोखण्यासाठीही फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे विधानसभेत एकही जागा मिळाली नाही. त्यानंतरही काँग्रेस झोपेतच राहिली. आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्या असतानाही पक्षवाढीसाठी कोणत्याही मोहिमा न घेता काँग्रेस शांत आहे. पक्षांतर्गत कोणतेही बदल न झाल्याने काँग्रेस अस्तित्व नसल्यासारखी झाली आहे. शहराध्यक्षपद हे अद्याप प्रभारीच आहे.

आता प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आल्याने ‘नवा गडी, नवा राज’ आला आहे. पुण्यात काँग्रेसला पूर्ववैभव येण्यासाठी नवीन प्रदेशाध्यक्ष हे पुण्यात नव्या नेतृत्वाला संधी देऊन कारभार हाती देणार का, यावर शहरातील काँग्रेसचे आणि आगामी महापालिका निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

sujit. tambade @expressindia. com