पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज (१२ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावी प्रवेशाठी ३२४ महाविद्यालयांत एकूण एक लाख १४ हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात ९० हजार १०९ जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर राखीव (कोटा) प्रवेशांसाठी २४ हजार ४११ जागांचा समावेश आहे. आत्तापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये कोटा आणि केंद्रिभूत प्रवेश मिळून ३७ हजार ८५१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर प्रवेशासाठी ७६ हजार ६९९ जागा उपलब्ध आहेत.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पात्रता गुण नव्वदीपार असल्याने तिसऱ्या फेरीत तरी पात्रता गुणांमध्ये घट होणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या फेरीतील नियमित प्रवेशांबरोबरच द्विलक्ष्यी आणि कोटाअंतर्गत प्रवेश १४ जुलैपर्यंत होणार आहेत.