पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. चालू वर्षी १ जानेवारीपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातून तब्बल पाच लाख ५४ हजार ९०० विविध प्रकारचे अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. तसेच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर १८ ते ५० वयोगटातील तब्बल एक लाख २४ हजार ५५ मतदार वाढले आहेत. प्रारूप मतदारयादीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून एकूण ८० लाख ७३ हजार १८३ मतदार झाले आहेत. त्यामध्ये सुमारे सव्वा लाख मतदारांची नव्याने भर पडल्याने मतदारसंख्या ८१ लाख ९७ हजार होणार आहे. परिणामी यंदा लोकसभा निवडणुकीत पुण्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता जिल्हा निवडणूक शाखेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. चालू वर्षी १ जानेवारीपासून जिल्हा निवडणूक शाखेकडे नव्याने मतदार नोंदणी, पत्त्यात बदल, नाव वगळणी, मतदारसंघ बदल असे विविध प्रकारचे तब्बल पाच लाख ५४ हजार ९०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार लाख १५ हजार ५० अर्ज छाननी केल्यानंतर वैध ठरविण्यात आले आहेत, तर ४८ हजार ८० अर्ज पुरेसे पुरावे न जोडल्याने बाद करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर १८ ते १९ वयोगटातील ३२ हजार ४४० मतदार वाढले आहेत. २० ते २९ वयोगटातील ५६ हजार १४, ३० ते ३९ वयोगटातील २६ हजार २३०, तर ४० ते ४९ वयोगटातील ९३७१ मतदार वाढले आहेत. एकूण १८ ते ४९ या वयोगटातील ९३७१ मतदार वाढले आहेत.
हेही वाचा – करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कुठे आढळला पहिला रुग्ण?
हेही वाचा – शैक्षणिक अभ्यासक्रमातून आता निवडणूक प्रक्रियेचे धडे… नेमके होणार काय?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व वयोगटातील पुणेकरांनी उत्साह दाखवत मतदार नोंदणी केली आहे. प्राप्त अर्जांची संख्या राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढण्याची आम्हाला आशा आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सांगितले.