लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे-बेंगळुरू बाह्यवळणावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहमती दर्शविली आहे. त्यानुसार या उपाययोजना करण्यासाठी तीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यास गडकरी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

पुणे-बेंगळुरू बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक पोलिसांबरोबर चर्चा करून उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरूद्ध पावसकर यांच्यासमवेत उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.

आणखी वाचा-खड्ड्यांची धास्ती ‘पीएमआरडीएला’ही! दुरवस्थेला मेट्रोला जबाबदार ठरवून रस्ता दुरुस्तीसंदर्भात नोटीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर असताना या आराखड्याचे सादरीकरण त्यांच्यासमोर करण्यात आले. त्यावेळी आराखड्यानुसार उपाययोजना करण्यासाठी तीनशे कोटींचा निधी तत्त्वत: मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आराखड्यातील प्रस्तावित कामे कोणती?

महापालिकेच्या माध्यमातून भूमकर अंडरपास शेजारी प्री-कास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास करण्यात येणार आहे. ननावरे अंडर पासजवळ किया शोरुम येथे आणि रिनॉल्ट शोरुम येथे प्रत्येकी एक असे दोन अंडरपास प्रस्तावित आहेत. नवले ब्रीज येथे नऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एका मार्गिकेवर कॉन्टिलिव्हर ब्रीज बांधून इतर सर्व मार्गिका सिग्नलमुक्त करण्यात येतील. पाषाण-सूस रस्त्यावरून महामार्गाला जोडणारा जोड रस्ता आणि सेवा रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत. राधा हॉटेल येथील पीएमपीएमएलची जागा आणि हॉटेल ऑर्किड समोरील जागेवर १०० मीटर मार्जिन रस्ता प्रस्तावित असून याठिकाणी अंडरबायपास तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांपैकी २७.९९ किलोमीटर लांबीचे आणि १२ मीटर रुंदीचे सेवा रस्ते प्रस्तावित आहेत. महापालिकेकडून ४९.१२ लांबीचा व १२ किमी रुंदीचा बाह्य सेवा रस्ता तयार करण्यात येणार असून बालेवाडीकडून मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजित आहे.

आणखी वाचा-पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना

पुणे-बेंगळुरू बाह्यवळणाची वस्तुस्थिती

  • गेल्या पाच वर्षांत सुमारे २० लाख वाहनांची वाढ.
  • पुण्याला रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो.
  • या रस्त्याची निर्मिती १९९४ मध्ये दुपदरी महामार्ग म्हणून करण्यात आली होती.
  • हा बायपास २००० मध्ये रस्ता वाढवून चौपदरी करण्यात आला.
  • २०१० मध्ये सहापदरी रस्ता प्रस्तावित झाला असून या सहा रस्त्यांची कामे अजून काही ठिकाणी प्रगतिपथावर आहेत.
  • या रस्त्यावर गेल्या तीन वर्षांत शंभराहून अधिक अपघात झालेले असून त्यामध्ये ६८ लोकांनी जीव गमावलेला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बेंगळुरू रस्त्यावरील उपाययोजनांना तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी एनएचआय, पुणे महापालिका तसेच पुणे पोलिसांनी एकत्रिकपणे या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या उपाययोजनांनंतर या बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार आहे. -चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री