लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होण्याचा अंदाज आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे यंदा सर्वच पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ६६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. कृषी आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रब्बी हंगामातील सरासरी लागवडी खालील क्षेत्र सुमारे ५४ लाख हेक्टर आहे. मागील वर्षी सुमारे ५९ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आजवरचा उच्चांकी ६६ लाख हेक्टरवर पेरा जाण्याचा अंदाज आहे.
रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये ज्वारी १६ लाख हेक्टरवर होती, ती वाढून १८ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. गहू १०.४७ लाख हेक्टरवर होता, तो १२ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. मका ३.५७ लाख हेक्टरवर होता, तो वाढून पाच लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. रब्बीत हरभरा महत्त्वाचे पीक असते. मागील वर्षी २६.८८ हेक्टरवर हरभरा होता, तो यंदा वाढून ३० लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. तेलबियांमध्ये करडईचे क्षेत्र वेगाने कमी होत आहे. मागील वर्षी फक्त ०.४१ हेक्टरवर करडई होती, ती यंदा एक लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट्ये आहे. जवस लागवड जवळपास बंद झाली आहे. मागील वर्षी फक्त सात हजार हेक्टरवर होती, ती वाढवून २० हजार हेक्टरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. अन्य तेलबिया, तृणधान्ये, अन्नधान्य आणि कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रातही वाढीचा अंदाज आहे.
आणखी वाचा-कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
राज्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५४ लाख हेक्टर आहे. पावसाळ्यातील पर्जन्यवृष्टी, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता, सिंचनाच्या सोयी, नगदी, फळपिकांचे वाढते क्षेत्र आदीमुळे रब्बी हंगामातील क्षेत्र कमी होत आहे. पण, यंदाच्या पावसाळ्यात हिंगोली आणि अमरावतीचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रात सात ते आठ लाख हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे.
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या लागवडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. चारा, पशुखाद्य आणि इथेनॉलसाठी मागणी वाढल्यामुळे मका पिकाच्या लागवडीत चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे. रब्बीत हरभरा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, त्यातही वाढीचा अंदाज आहे, अशी माहिती कृषी संचालक (विस्तार आणि प्रशिक्षण) विनय कुमार आवटे यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd