पिंपरी : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार यांची पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलकदेखील शहरात झळकले आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी मुंबईत ‘देवगिरी’वर जाऊन पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे पिंपरीतील एकमेव आमदार अण्णा बनसोडे हे सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबतच आहेत. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पवार यांच्या अभिनंदनाचे फलक लावले आहेत.

हेही वाचा >>>महिलेने गुप्तांगात लपविले २० लाखांचे सोने; केंद्रीय सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळावर पकडले

दरम्यान, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. ते मुंबईला गेले नव्हते. त्यांचा भ्रमणध्वनीदेखील बंद आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनेवर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीत कार्यरत असलेल्या बहुतांश नेत्यांना पवार यांनी पदे दिली आहेत. पालिकेत सत्ता असताना अनेकांना विविध पदे दिली. त्यामुळे पदाधिकारी अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे दिसते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. त्यात पक्ष म्हणून पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : दर्शना पवार खून प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

उमेदवारीचा पेच वाढणार

बदलत्या राजकीय समीकरणामुळे उमेदवारीचा पेच वाढणार आहे. राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपच्या अमित गोरखे यांना शांत बसावे लागेल. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत. विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता कमी असल्याने पवार यांच्यासोबत असलेल्या नाना काटे यांचे काय होणार हा प्रश्न आहे. भाजपचे शहराध्यक्ष असलेले महेश लांडगे हे भोसरीचे आमदार आहेत. भाजपचा राजीनामा दिलेले आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले रवी लांडगे यांची अडचण झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर भोसरीची गणिते अवंलबून राहतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With ajit pawar office bearer of nationalist party in pimpri chinchwad pune print news ggy 03 amy