Korean population in Talegaon: पुण्यातील तळेगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्रात दक्षिण कोरियातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई, स्टील कंपनी पॉस्को आणि खाद्य उद्योग लोट्टे अशा कोरियन उद्योगांनी हातपाय पसरले आहेत. याच परिसरात हांगाग रिसॉर्ट आहे, जेथील खोल्या ह्युंदाईच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असतात. रिसॉर्टच्या मोकळ्या प्रांगणात कोरियाचा प्रसिद्ध खेळ जोक्गुची झलक पाहायला मिळते. जोक्गु खेळात टेनिसप्रमाणे पण छोट्या उंचीवर नेट बांधलेले असते. पण रॅकेटऐवजी फुटबॉलच्या आकाराचा बॉल पायाने मारायचा असतो, रिसॉर्ट चालविणाऱ्या ली जून सेओ यांनी ही माहिती दिली. द इंडियन एक्सप्रेसने पुण्यातील या छोट्या दक्षिण कोरियाचा आढावा घेतला असून येथील कोरियन लोकांची खानपान संस्कृती, त्यांची शेती, त्यांचा इतर भारतीय लोकांबरोबरचा अनुभव याबाबत लेख प्रकाशित केला आहे.
सेओ यांचे कुटुंबिय दहा वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल या शहरातून पुण्यात आले. अनेक कोरियन कारखाने तळेगाव एमआयडीसीमध्ये येत असल्यामुळे इथे संधी उपलब्ध होतील, या आशेने सेओ यांचे कुटुंबिय याठिकाणी आले. हे कुटुंब जेव्हा पुण्यात आले. तेव्हा ली जून सेओ फक्त दहा वर्षांचा होता. त्यांच्या भावंडांना आणि त्याला इथले लोक खूप आवडले. यावेळी ली जून सेओ द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला, “कोरियन लोक लवकर खुलत नाहीत. जर तुमची आणि त्यांची ओळख नसेल तर ते पटकन जवळ येत नाहीत. पण भारतात तसे नाही. इथे तुम्ही अनोळखी असलात तरी तुम्हाला मैत्रीपूर्ण आदर दिला जातो. आता जेव्हा मी कोरियात जातो, तेव्हा तेथील लोकांशी जुळवून घेणे किती अवघड आहे, याची जाणीव होते. त्यापेक्षा भारतीय बरे.”
सेऊलमध्ये जाऊन शेफ होण्याचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी ली पुण्यातील शाळेत शिकला. तो सांगतो, “सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो तेव्हा लोकांना कोरिया माहीतच नव्हते. जेव्हा मी त्यांना सांगायचो की मी कोरियन आहे. तेव्हा ते मला विचारायचे दक्षिण की उत्तर? पण आता के-पॉप, के-ड्रामा यांच्यामुळे अनेकांना कोरियन लोकांबद्दल माहिती मिळाली आहे. आता जेव्हा मी बाहेर फिरत असतो तेव्हा लोक मला येऊन तू चीनी आहेस का? असे न विचारता तू कोरियन आहेस ना, असे विचारतात.”
येतील रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी छोटे छोटे केबिन आणि एक मोठी जागा आहे. कोरियन लोकांना आपला खासगीपणा जपायला आवडतो. त्यामुळे ही व्यवस्था. हॉटेलच्या स्वयंपाकघरात कोरियन जेवण बनते. कोरियन लोक स्वच्छतेबाबत खूप आग्रही असल्यामुळे हॉटेलमध्ये टापटीपपणा ठेवावा लागतो. ली यांच्या रिसॉर्टचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे जिम, पूल टेबल आणि गोल्फसाठी सुविधा आहे. तसेच रिसॉर्टच्या बागेत प्रसिद्ध कोरियन सलाड लेट्यूसच्या पेट्या दिसतात. हे सलाड भारतात सहज उपलब्ध होत नाही.
इथून पुढे काही मिनिटांच्या अंतरावर सूमूनान हॉटेल आहे. जिथे अनेक कोरियन लोक राहतात. हॉटेलमध्ये प्रवेश केल्या केल्या पूल टेबल दिसतो. या जागेचे मालक शरद गडसिंग म्हणाले की, कोरियन कर्मचाऱ्यांना त्यांच्यातील लोकांमध्येच मिसळायला आवडते. कारण भाषेची अडचण असल्यामुळे ते इतर लोकांबरोबर सहजासहजी मिसळत नाहीत. गडसिंग कुटुंबिय आणि येथील कोरियन लोक आता खाद्यपदार्थांची देवाणघेवाण करताना दिसतात. गडसिंग म्हणतात, त्यांनी सलाड पिकविण्यासाठी जमीन मागितली होती, ती आम्ही देऊ केली.
या हॉटेलमधील कोरियन कर्मचारी येथे जवळच लेट्यूस सलाड आणि कांद्याची लागवड करतात. कामावरून परतल्यानंतर रोज ते शेतीची मशागत करतात, असे येथील स्थानिकांनी सांगितले.

तळेगावमधील कोरियन रेस्टॉरंटवर नजर टाकल्यास येथे किती कोरियन लोक आहेत, याचा अंदाज येतो. येथील सेऊल स्टोअरमध्ये कोरियन खाद्य बनविण्यासाठीचे मसाले आणि इतर पदार्थ मिळतात. आठवड्याच्या शेवटी शंभरहून अधइक कोरियन ग्राहक त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेण्यासाठी इथे येतात. ईडन रेस्टॉरंट आणि गांग द पॅलेस अशा हॉटेलचे फलकही कोरियन भाषेतच आहेत.
पुण्यात किती कोरियन नागरिक?
ली यांनी सांगितले की, पुण्यात सध्या सुमारे १,००० कोरियन नागरिक राहत आहेत. तळेगाव, चाकण आणि रांजणगाव येथील कारखान्यांमध्ये ते काम करतात. ली जून सेओप्रमाणेच जे कोरियन कुटुंबे पुण्यात स्थायिक झाले आहेत, ते हिंजवडीतील महिंद्रा आंतरराष्ट्रीय शाळेसारख्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. बालेवाडी-बाणेर येथे राहणारे काही वरिष्ठ कोरियन अभियंते हे बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकडमधील फिनिक्स मॉलमध्ये नेहमी फेरफटका मारत असतात. येथील नान आणि चिकन तंदुरी त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत.