पुणे : फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवरील १३ वर्षांखालील मुलांची खाती ओळखण्यासाठी आता मेटा कंपनीकडून कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. मुले कोणाशी संपर्क साधतात, कोणाशी जोडले जातात, याचा एआयद्वारे पाठपुरावा करून अशी खाती ओळखण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खाते उघडण्यासाठी किमान १३ वर्षांची वयोमर्यादा असताना अनेक लहान मुले खोटे वय दाखवून खाते उघडतात. या लहान मुलांसाठी समाजमाध्यमे हे एक वेगळेच विश्व असते. त्यावरील अनेक गोष्टी त्यांच्या वयाला साजेशा नसतात. त्यामुळे या मुलांच्या भावविश्वावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे ओळखून फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पालक कंपनी ‘मेटा’कडून हे पाऊल उचलले जात आहे. समाज माध्यमांवर लहान मुलांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येतात. ऑनलाइन विश्वात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर ‘मेटा’कडून मुलांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यात आली आहेत.
हेही वाचा : जिवाला धोका असूनही महिलेने घेतला गर्भधारणेचा निर्णय…माता, बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश
याबाबत इन्स्टाग्रामच्या सार्वजनिक धोरण विभागाच्या प्रमुख नताशा जोग यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही मंचांवर खाते उघडणारी १३ वर्षांखालील मुले आढळून आल्यास त्यांना वयाचा पुरावा सादर करण्यास सांगितले जाते. त्यांनी तो पुरावा सादर न केल्यास त्यांचे खाते बंद केले जाते. लहान मुलांची खाती शोधण्यासाठी आमच्याकडून कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यात लहान मुले कोणासोबत संवाद साधत आहेत, कोणाशी जोडली जात आहेत या गोष्टी कृत्रिम प्रज्ञेद्वारे पडताळून पाहिल्या जातात. त्यातून त्यांचा वयोगट लक्षात येतो. त्याचबरोबर मुले एकमेकांना वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश देतात. त्या वेळी त्या संदेशांत नेमका कितव्या वाढदिवसाचा उल्लेख होत आहे, हेही कृत्रिम प्रज्ञेद्वारे शोधले जाते. त्यातून १३ वर्षांखालील मुलांची खाती शोधणे शक्य होते.’
‘प्रौढांच्या गोष्टी मुलांसाठी नकोत’
‘फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ३० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी जो आशय दिला जातो, तोच लहान मुलांना मिळण्याची आवश्यकता नाही,’ असे नमूद करून नताशा जोग म्हणाल्या, ‘मुलांना त्यांच्या वयोगटानुसार अनुभवाचे अवकाश मिळायला हवे. म्हणूनच त्यांना वयानुसार अनुचित असलेल्या गोष्टी न दाखविण्याची काळजी घेतली जाते. यासाठी अनेक चाळण्यांचा (फिल्टर) वापर आमच्याकडून केला जातो. त्याचबरोबर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यातून मुले, शिक्षण आणि पालकांना डिजिटल सुरक्षेबाबत माहिती दिली जात आहे.’
हेही वाचा : पुणे: वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या
देशातील समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव
- फेसबुक वापरकर्ते ३७.८० कोटी
- इन्स्टाग्राम वापरकर्ते ३६.२९ कोटी
- जगात फेसबुक, इन्स्टाग्रामचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात
- वापरकर्त्यांमध्ये किशोरवयीन मुले, तरुणांचे प्रमाण अधिक
(स्रोत : स्टॅटिस्टा)
‘मेटा’ने गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन सुरक्षिततेला चालना देण्यासाठी ५० हून अधिक सुरक्षा साधने तयार केली आहेत. लहान मुलांच्या समाजमाध्यम वापराबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. यासाठी शाळांमध्ये जाऊन मुले, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला जात आहे.
नताशा जोग, प्रमुख, सार्वजनिक धोरण, इन्स्टाग्राम