पिंपरी-चिंचवड शहरातील ६५ हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने तोडगा काढू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी भोसरीत दिली.
भोसरीतील ‘हेल्थ प्लस’ या रुग्णालयाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, बापू पठारे, शहराध्यक्ष योगेश बहल, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम आदी या वेळी उपस्थित होते. शहरातील ६५ हजार बांधकामे पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. अशी बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव पाठवणे ही चूक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले असून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई अपेक्षित असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी अजितदादा कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. रविवारी ते खासगी कार्यक्रमासाठी आले, तेव्हा या विषयावर भाष्य केले.
पवार म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाने नागरिक काळजीत पडले आहेत. न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. परंतु सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. नागरिकांनी कष्टाने घरे बांधली आहेत. या आदेशाने ते हवालदिल झाले आहे. या प्रश्नासाठी लांडे, जगताप, अण्णा बनसोडे हे तीनही आमदार प्रयत्न करत आहेत. आपणही मुख्यमंत्र्यांच्या मदतीने या प्रश्नी तोडगा काढण्याचे प्रयत्न करू. या पुढील काळात बेकायदा बांधकामे होता कामा नये, कामाचा दर्जा चांगला असावा, याकडे लक्ष दिले पाहिजे.
‘चुकीचे वागल्यास किंमत मोजावी लागते’
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी झालेल्या शिक्षेचे उदाहरण देऊन चुकीचे वागल्यास त्याची किंमत मोजावी लागते, अशी टीका अजित पवार यांनी केली. आपण विश्वस्त आहोत, मालक नाही, याचे भान ठेवले पाहिजे. नियम, कायदे मोडून चालणार नाही. अभिनेते संजय दत्तचे वडील खासदार, मंत्री होते. मात्र तरीही त्याला शिक्षा झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा