वनांच्या अधिसूचित क्षेत्रात मेंढय़ा चरायला सोडल्याबद्दल मेंढपाळ आणि वनखात्याचे होणारे वाद नवीन नाहीत. हे वाद मिटवण्याचा प्रयत्न पुण्यातील सुप्यात सुरू झाले आहेत. सुप्याच्या जंगलातील प्रमुख शिकारी असलेल्या लांडग्याला मेंढय़ांऐवजी त्याच्या मूळ भक्ष्याकडे – म्हणजे चिंकाराकडे वळवण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे. 
सुप्यातील मयूरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वनसंरक्षक आता परिसरात दृष्टीस पडणाऱ्या मेंढपाळांची माहिती टिपून घेत आहेत. काही अभ्यासकांनी या मेंढपाळांशी बोलून त्यांच्या समस्या समजून घ्यायलाही सुरुवात केली आहे. लांडगा आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था यांच्या अभ्यासासाठी वनखात्याने सप्टेंबरपासून ‘ओवीतला लांडगा’ या प्रकल्पाला सुरुवात केली असून या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा आहे.  
प्रमुख वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये म्हणाले, ‘‘पावसाळा सुरू झाला की कोकण भागातील मेंढपाळ घाटावर येतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जेव्हा वनखात्याकडून मेंढपाळांना वनात मेंढय़ा चरायला सोडण्यापासून अटकाव केला जातो, तेव्हा त्यांचे वनखात्याशी वाद होतात. या प्रकल्पात सहभागी झालेले अभ्यासक मेंढपाळांशी बोलून या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी मदत करतील. सुप्यात हिवाळ्यात लांडग्याची बिळे, लांडग्याची पिल्ले कुठे दिसली त्याच्याही नोंदी घेतल्या जात आहेत. लांडग्याचे मूळ भक्ष्य चिंकारा असून ते सोडून तो सहज उपलब्ध असलेल्या भक्ष्याला म्हणजे मेंढय़ांना पसंती देतो. मेंढय़ा अधिसूचित क्षेत्रात येणे थांबवता आले, तर लांडगा त्यांच्या मूळ भक्ष्याकडे परत जाऊ शकेल.’’   
निसर्ग व पुरातत्त्व अभ्यासक सायली पाळंदे-दातार म्हणाल्या, ‘‘गवताळ प्रदेशाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे त्यावरचा ताण वाढला आहे. ही नैसर्गिक संस्था वाचवणे आवश्यक आहे. दुसरीकडे मेंढपाळ गवताळ प्रदेशांचा खूप चांगला उपयोग करतात. त्यामुळे त्यांनाही पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. गवताळ प्रदेशाच्या वापरासंबंधीची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.’’  
पुढील एक वर्ष हा प्रकल्प चालणार आहे. सायली यांच्यासह सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे, निसर्ग शिक्षणातील तज्ज्ञ अनुज खरे आणि बिबटय़ाच्या अभ्यासक विद्या अत्रेय, वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी, त्रिशांत सिमलई, नित्या घोटगे, केतकी घाटे, अपर्णा वाटवे, प्रमोद पाटील आणि वन्यजीवशास्त्राच्या काही विद्यार्थ्यांचा या प्रकल्पात सहभाग आहे.
‘धनगरांच्या ओव्यांत लांडग्याचा उल्लेख असतो. लांडग्यांचे हल्ले होऊन जेव्हा शेळ्या किंवा मेंढय़ा मारल्या जातात, तेव्हा गावकरी वन खात्याकडे नुकसानभरपाई मागतात. पण मेंढपाळ कधीच अशी नुकसानभरपाई मागत नाहीत. धनगर आणि लांडगा यांचे नाते आणि लांडग्याचा गवताळ प्रदेशातील परिसंस्थेशी असलेला संबंध यांचा अभ्यास या प्रकल्पात करायचा आहे,’ असेही लिमये यांनी सांगितले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा