लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पालखी सोहळ्या दरम्यान महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीने हडपसर पोलीस ठाण्यातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरल्याप्रकरणी धुरपता अशोक भोसले (वय ३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. नांदेड) हिला मंगळवारी (२ जुलै) हडपसर पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांची नजर चुकवून बुधवारी (३ जुलै) भोसले हिने पलायन केले. याप्रकरणी कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याने महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी घेतला आहे.

आणखी वाचा-खंडेरायाच्या जेजुरी नगरीत भंडारा उधळून माउलींचे स्वागत

धुरपता भोसले असे पसार झालेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. हडपसर भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आल्यानंतर भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी आरोपी धुरपता भोसले हिला दागिने चोरताना रंगेहाथ पकडून हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस शिपाई ताराबाई खांडेकर यांच्याकडे देण्यात आली होती.

आरोपीस खोलीत बसवून खांडेकर दुसरे काम करत होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवून आरोपीने पोलीस ठाण्यातून पळ काढला. ती पसार झाल्याचे लक्षात आल्यावर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले गेले. परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे अटक आरोपीला योग्य ती खबरदारी घेत ताब्यात न ठेवल्याने बेजबाबदारपणा आणि बेपर्वाईचे वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलीस दलाची प्रतिमा या प्रकाराने मलीन झाली असून त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.