लोकॅन्टो अॅपवरुन महिलेशी मैत्री करणे सांगवीतील ४० वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले आहे. महिलेने त्या युवकाकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी सुरींद्रा उर्फ डॉली नजीर शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवीत राहणाऱ्या युवकाची ‘लोकॅन्टो’वरुन सुरींद्रा या महिलेशी ओळख झाली होती. सुरींद्राने त्याच्याकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी अडीच हजार रुपये मागितले. तक्रारदारानेही सुरींद्राला अडीच हजार रुपये दिले. मात्र, यानंतर सुरींद्राने एका पुरुष साथीदाराच्या मदतीने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर शरीरसंबंधांची माहिती पत्नी आणि आईला देऊ आणि तक्रारदार ज्या बँकेत काम करतात त्या बँकेत जाऊन गोंधळ घालण्याची धमकीही तिने तक्रारदाराला दिली. तडजोडी अंती तक्रारदाराने १० हजार रुपये देत हे प्रकरण मिटवले.
मात्र, यानंतरही महिलेकडून खंडणी मागण्याचे प्रकार सुरु होते. शेवटी तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेत महिला व तिच्यासोबतच्या पुरुष साथीदाराविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे तपास करत अवघ्या काही तासांमध्ये आरोपी महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली असून या महिलेने आणखी काही पुरुषांनाही अशाच पद्धतीने फसवले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकॅन्टो या अॅपवर स्पेशल सर्व्हिसच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरु असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.