पुणे : सिंहगड रस्ता भागातील धायरी परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षा प्रकाश रांगळे (वय ४५, रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा वैभव (वय २५) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पसार झालेल्या टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वर्षा रांगळे आणि कुटुंबीय धायरी भागात राहायला आहेत. ६ फेब्रुवारी रोजी त्या सायंकाळी सहाच्या सुमारास धायरी गावातील धायरेश्वर मंदिराजवळून निघाल्या होत्या. त्या वेळी पाठीमागून आलेल्या टँकरने दुचाकीस्वार वर्षा यांना धडक दिली.अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षां यांचा मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.
बेशिस्ती जिवावर
बेशिस्त अवजड वाहनचालकांच्या चुकांमुळे दुचाकीस्वार आणि पादचारी मृत्युमुखी पडतात. उपनगरातील गल्ली बोळात पाण्याचे टँकर, सिमेंट मिक्सरची वाहतूक सुरू असते. भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश नुकतेच दिले.
पाषाण भागात पादचाऱ्याचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आशिषकुमार सर्वानंद उपाध्याय (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आशिषकुमार यांचा भाऊ अभिषेकुमार (वय ३१) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिषकुमार हे पाषाण रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी ‘डीआरडीओ’ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषकुमार यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील तपास करत आहेत.