पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडले. तिच्याकडून २७० ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. महिलेने ओैषधांच्या कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी लपविल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा >>>‘३ हजार देतो तुम्ही एकदा…’ म्हणत महिलेचा विनयभंग; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात केंद्रीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्करी करणारी महिला मूळची दिल्लीतील आहे. पुणे-बँकाँक या विमानाने महिला लोहगावमधील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आली. महिला बँकाँकहून पुण्यात आली होती. विमानतळावर घाईत निघालेल्या महिलेला कस्टमच्या पथकाने पाहिले. संशय आल्याने कस्टमच्या पथकाने तिला अडवून चौकशी केली. तिच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा ओैषधी कॅप्सुल सापडल्या. कॅप्सुलमध्ये महिलेने सोन्याची भुकटी लपविल्याचे तपासणीत उघड झाले. कॅप्सुलमधून २७२ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे- बँकाँक विमानसेवा नुकतीच सुरू करण्यात आली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर बँकाँकहून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा पहिला प्रकार उघडकीस आला.