पुणे : मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या मुलास बरे करण्याचे आमिष, तसेच जादुटोण्याची भीती घालून एका महिलेकडून ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जादुटोण्याच्या भीतीमुळे महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबाचा सर्वनाश होईल, अशी भीती दाखवून महिलेकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याने अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारुदत्त संजय मारणे (वय ३१,रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव), पूनम घनश्याम कोहंडे (वय ३८), नीलम राहुल जाधव (वय ३५, रा. कर्वेनगर), देविका अमित जुन्नरकर (वय ३०, रा. उत्सव मंगल कार्यालयामागे, कोथरुड), संतोष मारुती येनपुरे (वय ४५, रा. गणेशपुरी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. महिलेचा मुलगा मानसिक विकाराने ग्रस्त आहे. कौटुंबिक अडचणी सोडविणे, तसेच मुलाला मानसिक विकारातून बरे करण्याचे आमिष आराेपींनी दाखविले. त्यासाठी काही विधी करावे लागतील, असे आरोपींनी सांगितले. आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये उकळले.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आणि….

त्यानंतर आरोपींनी महिलेला नरबळी द्यावा लागेल, असे सांगून आणखी ५० लाख रुपये देण्याची मागणी केली. नरबळी न दिल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल, तसेच मुलगा आणि पतीचा मृत्यू होईल, अशी भीती आरोपींनी घातली. आरोपींनी जादुटोण्याची भीती दाखविल्याने महिला घाबरली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman cheated for 35 lakh rs using fear of black magic pune print news rbk 25 pbs