पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शिवाजीनगर भागातील एका एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी खात्यातून ८० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला दौंड शहरात राहायला आहेत. त्या पुण्यात कामानिमित्त आल्या आल्या होत्या. शिवाजीनगर परिसरातील वीर चापेकर चौकात असलेल्या एका एटीएमधून त्या पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एक चोरटा एटीएम केंद्रात शिरला. मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्याने महिलेकडून एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड महिलेला दिले. एटीएमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी केली. त्यानंतर महिला एटीएम केंद्रातून बाहेर पडली.
चोरट्याने महिलेचे एटीएम कार्ड चोरले होते. चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करुन खात्यातून ८० हजार रुपये चोरले. महिलेच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करुन फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. एटीएम केंद्राच्या परिसरात चोरट्यांचा वावर असतो. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याचा बहाणा करनु चोरटे खात्यातून पैसे चोरतात. आठवडभरात अशा प्रकारचे पाच गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
© The Indian Express (P) Ltd