पुणे : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रियंका अक्षय गाडे (वय २७, रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती अक्षय राजेंद्र गाडे (वय २९ रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर, मूळ रा. कोतन, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियंका यांचे वडील अजिनाथ सीताराम चांदणे (वय ६१, राा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षयने प्रियंकाकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तिने नकार दिल्याने तो तिला त्रास देत होता. अक्षय तिला मारहाण करायचा. त्याच्या छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली.
हेही वाचा >>>नो एंट्रीतून येणाऱ्या मोटारचालकाची मुजोरी; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण
प्रियंकाने आत्महत्या करण्यापूर्वी एका पुठ्ठ्यावर मजकूर लिहून ठेवला होता. त्याच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने पुठ्ठ्यावर लिहून ठेवले होते. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. प्रियंकाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.