पुणे: पतीचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू असल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात घडली. पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. सारिका विकास शेळके (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विकास दामू शेळके (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सारिकाचे वडील शामराव पाटील (वय ५५, रा. कोल्हापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सारिकाचा विकास याच्याशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर विकासचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती सारिकाला मिळाली. सारिकाने याबाबतची माहिती वडिलांनी दिली. विकासला नातेवाईकांनी समजावून सांगितले. महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडून टाका. संसार व्यवस्थित करा, असे विकासला नातेवाईकांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणारा पोलीस शिपाई निलंबित
त्यानंतर विकासचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने दिलेल्या त्रासामुळे सारिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीचे प्रेमप्रकरण आणि छळामुळे मुलगी सारिकाने आत्महत्या केल्याचे सासरे शामराव पाटील यांनी फिर्यादीत म्हटले. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करुन विकासला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एन. एस. लहाने तपास करत आहेत.