वैयक्तिक फायद्यासाठी किंवा आपला दबाव निर्माण करण्यासाठी अनेकजण पोलीस असल्याचा बनाव करत असल्याची प्रकरणं समोर आली आहेत. पण पुण्याच्या भोसरीमध्ये चक्क एका महिलेनं पोलीस असल्याचं सांगत अक्षरश: गोंधळ घातला. या प्रकारामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकातील पोलिसांचा देखील सुरुवातीला गैरसमज झाला. मात्र, नंतर एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या महिलेचं बिंग फुटलं आणि खरा प्रकार समोर आला. हे सगळं करण्यामागचं कारण महिलेनं सांगितल्यानंतर भोसरी एमआयडीसीमधील पोलीस देखील आश्चर्यचकित झाले. हे सगळं नाट्य करणाऱ्या २७ वर्षीय महिलेचं नाव कविता प्रकाश दोडके असं आहे.

नेमकं झालं काय?

कविता दोडके ही सोमवारी संतोष पोटभरे नावाच्या एका २४ वर्षीय तरुणासोबत भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकात पोहोचली. तिथे “बाळू पोटभरे नावाच्या व्यक्तीची चौकशी कशाला करत आहात? मलाही कायदा कळतो” असं म्हणत कविताने गोंधळ घालायला सुरुवात केली. कवितानं पोलीस असल्याचा इतका हुबेहूब अभिनय केला की काही काळ तिथले पोलीस देखील तिच्या या नाटकामुळे गोंधळून गेले. मात्र, त्याचल्याच एका पोलिसाने प्रसंगावधान दाखवत कविताला तिचा बक्कल नंबर विचारला. इथे मात्र कविता गोंधळली आणि तिचं बिंग फुटलं!

नेमका काय आहे प्रकार?

कविताचं बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी तिच्या चौकशीमध्ये खरा प्रकार उघड झाला. कविता आणि संतोष पोटभरे यांचे प्रेमसंबंध आहेत. त्याचा भाऊ बाळू पोटभरे याच्यावर एका कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. बाळूचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस त्याच्या घरी पोहचले तेव्हा त्याचा भाऊ संतोष पोटभरे घरी होता. संतोषनं लागलीच याबद्दल कविताला सांगितलं. आपण मुंबई पोलिसात असल्याचं सांगत कवितानं पोलीस स्थानकात गोंधळ घातला. बक्कल नंबरची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुंबई कार्यालयात फोन करून कविता नावाची कोणी महिला पोलीस आहे का? अशी विचारणा केल्यानंतर ती तोतया असल्याचं समोर आलं. तसं कविताने मान्य केलं असून तिच्यासोबत प्रियकर संतोषवर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.

प्रियकरालाही फसवलं!

कवितानं प्रियकरालाही फसवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. कविताने संतोषला “मी मुंबई पोलिसात आहे, मला निलंबित केलं आहे”, असं खोटं सांगितलं होतं. कविताने पोलीस होण्यासाठी पोलीस भरती परीक्षा देखील दिली होती. मात्र, परीक्षा पास होऊ शकली नसल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.