लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : प्रसूती झाल्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच वायसीएममध्ये हलविल्याने आणि त्यात ४० मिनिटांचा वेळ गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

पिंपरीतील कैलाशनगर येथील श्वेता अश्विन यादव ही ३० वर्षांची गरोदर महिला २० मे रोजी नियमित तपासणीसाठी जिजामाता रुग्णालयात गेली होती. त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. २१ मे रोजी दुपारी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. २२ मे रोजी त्यांना सकाळी साडेआठ वाजता प्रसूतीसाठी दाखल केले. त्यांचे सिझेरिअन करण्यात आले. बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवण्यात आले. श्वेता यांना रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी वायसीएमला नेण्यास सांगितले. वायसीएममध्ये घेऊन जाण्यास ३५ ते ४० मिनिटांचा कालावधी गेला. तिथे उपचार झाले. परंतु, दुसऱ्याच दिवशी २३ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास उपचारादरम्यान श्वेता यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या पडल्या बाहेर अन् रोजगारावरही गदा! कंपन्याचा काढता पाय का? जाणून घ्या…

दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, की श्वेता यादव या महिलेचे सिझेरिअन झाले होते. जास्त रक्तस्राव होत असल्याने वायसीएम रुग्णालयात दाखल करावे लागले. रक्तस्राव थांबत नसल्याने महिलेची पिशवी काढली. महिलेला रक्तपुरवठाही केला. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही जास्त रक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. उपचारात दिरंगाई झाली नाही. बाळ व्यवस्थित असून, नातेवाइकांकडे दिले आहे.

महापालिकेने ४० कोटी रुपये खर्च करून जिजामाता रुग्णालय उभारले आहे. उपचारासाठी मोठी उपकरणे असतानाही महिलेचा मृत्यू झाला. महापालिका याची जबाबदारी घेणार आहे का? सर्व यंत्रणा, डॉक्टर असताना महिलेला चालू उपचारादरम्यान वायसीएममध्ये दाखल करावे लागत असेल, तर एवढे मोठे रुग्णालय उभारून फायदा काय? याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश वाघमारे यांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman died during treatment after delivery at yashwantrao chavan memorial hospital pune print news ggy 03 mrj
Show comments