लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विवाह समारंभावरुन घरी निघालेल्या पादचारी महिलेचा भरधाव पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील नातूबाग परिसरात घडली. अपघातात महिलेची १४ वर्षांची नात जखमी झाली.
आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती (वय १४) ही जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-पुणे : अफगाणिस्तानातील लसूण बाजारात, उच्चांकी दरामुळे लसणाची आयात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाहासाठी शनिवारी रात्री पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास साळुंके, त्यांची आई आशाबाई, मुलगी प्रचिती घरी निघाले. सातारा रस्त्यावरील नातूबाग परिसरात ते रस्ता ओलांडत होते. रिक्षाने ते घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करत आहेत.