नगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी टेम्पो चालकास अटक करण्यात आली. केवलबाई गंगाराम शिरसाठ (वय ५९ मूळ रा. शिरपूर खरदे, जि. धुळे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालक सिरगप्पा शिवप्पा उन्नन (वय ३५, रा. पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली.
हेही वाचा- विमानतळावरील सर्वेक्षणात पुण्यातील आणखी एका प्रवाशाला करोना संसर्ग
गंगाराम शिरसाठ (वय ६६) यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरसाठ दाम्पत्य पुणे-नगर रस्त्यावरुन निघाले होते. वाघोली परिसरातील शांताई हाॅस्पिटलसमोरुन ते रस्ता ओलांडत होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने केवलबाई शिरसाठ यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या केवलबाई यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पोचालक उन्नन याला अटक केली असून पोलीस कर्मचारी माने तपास करत आहेत.