पती व भावासोबत दुचाकीवरून जाताना शेजारून चाललेल्या मोटारसायकलला महिलेची ओढणी अडकल्याने दोघेजण रस्त्यावर पडले. त्याच वेळी एक भरधाव मोटार महिलेच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. पुणे-नगर रस्त्यावर आगाखान पॅलेससमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
सारिका रमेश गजरमल (वय ३०, रा. जुना जकात नाका, रामवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका या त्यांचा भाऊ विजय साळवे, पती रमेश यांच्या सोबत दुचाकीवरून येरवडा येथील स्वीमिंग टँक येथे पोहण्यासाठी जात होत्या. सारिका यांचे पती मोटारसायकल चालवत होते, तर त्यांच्या पाठीमागे भाऊ आणि सारिका बसल्या होत्या. नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेससमोर शेजारून जात असलेल्या मोटारसायकलच्या आरशाला सारिका यांची ओढणी अडकली. त्यामुळे मोटारसायकलचा तोल जाऊन सारिका व त्यांचा भाऊ रस्त्यावर पडले. सारिका या रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्या. त्याच वेळी येरवडय़ाकडे जात असलेल्या पाढऱ्या रंगाच्या मोटारीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये सारिका या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ओढणी अडकलेल्या दुचाकीचा किंवा डोक्यावरून चाक गेलेल्या मोटारीचा क्रमांक पाहिला असेल त्यांनी माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अहिरराव यांनी केले आहे.