वल्लभनगर आगारातील पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळून झालेल्या अपघातात ऑइल तपासत असलेल्या मॅकेनिक विभागातील महिला सहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
शिल्पा कैलास गेडाम (वय ३८, रा. एसटी कॉलनी, दापोडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिला सहाय्यकाचे नाव आहे. याप्रकरणी वसंत यमाजी रावते (वय ५३, रा. जुन्नर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत रमेश वाडकर (वय ३३, रा. जालना) या वाहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : मावळ पवना धरणग्रस्तांचा मोर्चा; पिंपरी-चिंचवडचे पाणी केले बंद!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा गेडाम या सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शिवशाही बसमधील ऑईल तपासत होत्या. शिवशाही बससमोर अहमदपूर आगाराची बस उभी होती. परतूर (जालना) आगाराची बस पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र अहमदपूर (लातूर) आगाराची बस तिथे उभी असल्याने बस काढण्यास अडचण येत होती. त्यामुळे परतूर बसचा वाहक प्रशांत वाडकर हा अहमदपूर आगाराच्या बसमधील सीटवर जावून बसला. त्याने परिवहन अधिका-यांची परवनागी न घेता बस सुरू केली. मात्र, बसमध्ये हवा कमी असल्याने बसचा ब्रेक लागला नाही. ती बस शिल्पा गेडाम ऑईल चेक करीत असलेल्या शिवशाही बसवर जोरात आदळली. दोन्ही बसच्यामध्ये सापडून शिल्पा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.