पुण्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं १५ वर्षीय लेकीचं स्वतःच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. यानंतर आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर जयराम दातखिळे असं गुन्हा दाखल झालेल्या २८ वर्षीय आरोपीचं नाव असून तो मूळचा उस्मानाबाद येथील रहिवाशी आहे. तर आरोपी आईचं नाव चंद्रकला शहादेव मखर (वय-३६) असून त्या पुण्यातील वडगावशेरी येथे वास्तव्याला आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या २०१९ मध्ये मुलीला घेऊन आपल्या गावी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे एका लग्नामध्ये आरोपी सागर जयराम दातखिळे याच्यासोबत आरोपी आई चंद्रकला यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपी सागर हा पुण्यात अनेकवेळा वडगावशेरी येथील घरी येत होता. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या नात्याची माहिती पीडित मुलीला झाली होती.

दरम्यान, आरोपी आईने पीडित मुलीचा विवाह आपल्या प्रियकराशी लावून दिला आहे. तू सागर जयराम दातखिळे याच्याशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी आईने दिली होती. या भीतीपोटी १५ वर्षीय मुलीने आरोपी सागर जयराम दातखिळे याच्या सोबत २०२२ मध्ये विवाह केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आहे.

या प्रकाराबाबत पीडित मुलीने तिच्या शाळेतील मित्राला संपूर्ण अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर या घटनेची माहिती त्याच परिसरातील एका महिलेला मिळाली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. संबंधित महिला पीडित मुलीला चंदननगर पोलीस ठाण्यात आल्या. यानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सागर जयराम दातखिळे आणि आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या दोघांविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती चंदननगर पोलिसांनी दिली.