पुणे : कौटुंबिक वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील शिंदे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा खून केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पती पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन (वय ४०) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय शंकर चौधरी (वय ५५, रा. तुकाई दर्शन, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सरेन दाम्पत्य मूळचे पश्चिम बंगालमधील आहे. ते हडपसर परिसरातील शिंदे वस्ती परिसरातील दत्तात्रय चौधरी यांच्या चाळीत राहायला आहे. आरोपी देबीलाल आणि त्याची पत्नी आरती मजूरी करतात. त्यांना सहा वर्षांच्या मुलगा आहे.
हेही वाचा >>>दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. तारा भवाळकर यांची निवड
सरेन दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यात वाद झाला. भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. देबीलालने पत्नी आरतीचे डोके भिंतीवर आपटले, तसेच तिच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केला. आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे सहा वर्षांचा मुलगा आर्यन याला घेऊन आरोपी देबीलाल घरातून पसार झाला. शनिवारी सकाळी सरेन यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खोली मालक चौधरी यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी दिली.
पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.