पिंपरी : दापोडीत भिंत पडून ठार झालेली वयोवृद्ध महिला आणि कासारवाडीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेला दोन वर्षांचा मुलगा, या दोन स्वतंत्र ठिकाणी झालेल्या घटनांची महापालिकेने गंभीरपणे दखल घेतली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दापोडीत स्नेहलता गायकवाड (वय ६२) यांचा घराजवळीत भिंत अंगावर कोसळून काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदलीचे प्रकरण झाले. त्यात भिंत कोसळून महिलेचा जीव गेल्याची गंभीर घटना दुर्लक्षित राहिली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी, या एकूण प्रकरणासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. सात दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना समितीला करण्यात आली. प्रत्यक्षात, ती मुदत केव्हाच संपून गेली. या प्रकरणाबाबत पालिकेने मौन साधले आहे.
हेही वाचा >>> पुणे राज्यात सर्वांत थंड; ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील दुसरे नीचांकी तापमान
कासारवाडीत रहदारीचा रस्ता सिमेंटीकरणासाठी महिनाभरापासून खोदून ठेवल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यंकटेश शंकर डोकडे (वय २) या मुलाचा बळी गेला. अतिशय संथ गतीने कासारवाडी-पिंपळे गुरव मार्गांवरील रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू आहे. त्यासाठी महिनाभरापासून रस्ता खोदून ठेवला आहे. या धोकादायक रस्त्याकडे पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच व्यंकटेशचा जीव गेल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी केली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी: आठवले यांच्या उपस्थितीत आज रिपाइंचा महिला मेळावा
या दोन्ही घटना उजेडात आल्यानंतरही महापालिकेकडून दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विकास आराखड्यानुसार कासारवाडीतील रस्ते ताब्यात आलेले नाहीत. तरीही रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याची घाई पालिकेने केली. अधिकारी ठेकेदारांपुढे लाचार आहेत. नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो आहे. दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू होणे ही घटना पालिकेच्या बेजबाबदारपणाचाच कळस आहे.
– किरण मोटे, माजी नगरसेवक, कासारवाडी
दापोडीत भिंत पडल्याने महिलेचा जीव गेला, मात्र या प्रकरणात समिती नेमण्यापलिकडे पिंपरी पालिकेने काहीच कारवाई केली नाही. या समितीचा अहवालही जाहीर करण्यात आला नाही.
– राजेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक, दापोडी